सांगली:प्रतिनिधी
दि. ३१ : आयुष्मान भारत मिशन उपक्रमात दिशादर्शक काम व्हावे. याबाबत कोणत्याही तक्रारी येऊ नयेत. योजनेतील त्रृटी दूर करून सर्वंकष आयुष्मान भारत योजना करण्यावर भर आहे, असे प्रतिपादन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे केले.आयुष्मान भारत व आरोग्य विषयक योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, यादीतील रूग्णालयांचे प्रतिनिधी, आरोग्यविषयक काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिल्ह्याने केलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून ओमप्रकाश शेटे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आरोग्य यंत्रणांचे कर्तव्य आहे. रूग्णांचे जीवित त्यांच्या हातात असते. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात आयुष्मान भारत योजनेचे काम राष्ट्रकार्य म्हणून करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्मान योजना याचे एकत्रिकरण करत सामान्य लोकांना जास्तीत जास्त आरोग्यविषयक लाभ देण्यासाठी सर्वंकष करण्यासाठी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या प्रमुख पदी श्री. शेटे आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना देण्यासाठी ते सध्या राज्याचा संवाद दौरा करीत आहे. आज सांगली जिल्हा दौऱ्यामध्ये त्यांनी गोल्डन कार्ड वितरण, आयुष्मान कार्ड वितरण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व त्यातील उल्लेखनीय काम यासह रूग्ण व रूग्णालयांच्या अडचणी, अन्य तक्रारी, योजना प्रत्यक्षात राबविण्यात येणाऱ्या त्रृटी यांचा आढावा त्यांनी घेतला.