राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपुजन सर्वसामान्यांचे समाधान हेच पुण्य-पालकमंत्री उदय सामंत

 

रत्नागिरी, दि. २२ :

राजापूर उपविभागीय कार्यालयाची होणारी नवीन इमारत हे सर्वसामान्य जनतेचे केंद्रबिंदू व्हावे. इथे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची कामे झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुण्य आहे, याची नोंद घेऊन काम करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपुजन कुदळ मारुन आणि कोनशिलेचे अनावरण करुन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रातांधिकारी डॉ. जास्मिन, माजी आमदार हुस्नबानू खलिपे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, राजापूर प्रांत कार्यालय हे आजवर भाड्याच्या कार्यालयात आहे. या कार्यालयाची स्वत:ची इमारत वर्षभरात पूर्ण होणार आहे. लोकप्रतिनिधी सक्षम असेल तर, विकासकामे होऊ शकतात. सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य असणारे किरण सामंत यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. आंदोलकांवर दाखल असणारे गुन्हे सरसकट मागे घेण्याची भूमिका मी मांडली. ते गुन्हे मागे घेण्याचे काम सुरु आहे. जबरदस्तीने कोणताही प्रकल्प करणार नाही, त्याबाबतचा गैरसमज दूर केला जाईल, ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे.
गतिमान भारतमधून ५ टक्के राखीव निधीमधून ५ कोटी रुपये खर्चून या कार्यालयाची इमारात होत आहे. ती चांगल्या पध्दतीने करुन घेण्याची जबाबदारी प्रांतांची आहे. तलाठी ते जिल्हाधिकारी पर्यंतची साखळी सक्षम असली पाहिजे. यासाठी तहसिलदार, पोलीस दल यांना नवी वाहने देण्यात आली. रुग्णवाहिका घेण्यात आल्या. यातून जिल्हा सक्षम झाला आहे.
हॉस्पिटल ऑन व्हील
गावागावात जाऊन रुग्णांची तपासणी करण्यासाठी ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ ही संकल्पना घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर येतोय. हे हॉस्पीटल गावागावात जाऊन विविध तपासण्या करेल. जिल्हा नियोजनमधून १ मेगाव्हॅटचा गोळप येथील वीजनिर्मिती प्रकल्प आणि सर्वसामान्यांची मुले नासाला भेट देण्यासाठी गेली, या दोन्ही उपक्रमांचा मुख्य सचिवांनी गौरव केला आहे. रत्नागिरी पॅटर्नमधून हे प्रकल्प राज्यात राबविले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा सक्षमपणाने काम करतोय आणि राज्यात विकासात्मक पुढे येतोय, असेही पालकमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांनी स्वागत प्रास्तविक करुन कार्यालयाची पार्श्वभूमी सांगितली. तहसिलदार विकास गमरे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला जिल्हा नियोजनचे सदस्य अश्पाक हाजू, आरडीसीचे संचालक अमजद बोरकर, चिपळूण अर्बनचे संचालक संजय ओगले, माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.