पवारांना धमकी देऊन गृहखातं हलविणारा कोण आहे सागर बर्वे? जाणून घ्या

मुंबई:प्रतिनिधि

दि:१३:जुन:दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सागर बर्वे असे त्याचे नाव असून त्याला ताब्यात घेणार आहे. सागर बर्वे हा नर्मदाबाई पटवर्धन या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवत होता.

पोलिसांनी तपास केल्यानंतर नर्मदाबाई पटवर्धन असे फेसबूक हा पेज सागर बर्वे चालवत असल्याचे समोर आले होते. तसेच हा इंजिनीअर असल्याची माहितीदेखील सुरुवातीला समोर आली होती. या फेसबूकपेजवरुन तुमचा लवकरच दाभोळकर करु अशी धमकी त्याने शरद पवारांना दिली होती. पोलिसांनी याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सागर बर्वे हा पुण्यातील कोथरुड भागात आपल्या वडिलांसह राहत होता. तसेच पोलिसांच्या माहितीनुसार सागर हा इंजिनिअर नसून फार्मासिस्ट आहे. सोसायटीच्या चेअरमनच्या म्हणण्यानुसार सागर हा दोन वर्षांपासून इथे राहतोय आणि हिंदुत्ववादी संघटनांशी तो निगडित आहे. दरम्यान सागर बर्वे हा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे का?, त्याच्यावर आणखी कोणते आरोप आहेत का?, त्याने आणखी असे काही केले आहे का?, याची चौकशी पोलीस करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकीनंतर त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसेच पवारांना आलेल्या धमकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते.