दत्ता सामंत खून खटल्यात छोटा राजनची निर्दोष मुक्तता

मुंबई:प्रतिनिधि

दि:२९:जुलै: २६ वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत यांची २६ वर्षांपूर्वी हत्या घडली होती. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे

दत्ता सामंत यांच्या खूनानंतर सुरुवातीच्या सुनावणींमध्ये स्थानिक लोकांवर गुन्हा दाखल करुन खटला चालवण्यात आला होता. त्यानंतर 2000 साली खटल्यावर निकाल देण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीनंतर छोटा राजनविरुद्धच्या खटल्यामध्ये दुसरा गुंड गुरु साटमसह गुंड रोहित वर्मा याला फरार घोषित करुन वेगळा खटला सुरु होता. छोटा राजनला 2015 साली इंडोनेशियामधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर खूनाचा खटला चालवण्यात आला होता.

मुंबईतीली साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये 16 जानेवारी 1997 रोजी 4 अनोळखी इसमांनी दुचाकीवर येत कामगार नेते दत्ता सामंत यांची गाडी अडवली होती. गाडी अडवल्यानंतर दुचाकीवर आलेल्या अनोळखी इसमांनी दत्ता सामंतांवर 17 गोळ्या झाडून पळ काढला होता. सामंत यांच्यासोबत असणाऱ्या गाडीचालक भीमराव सोनकांबळे यांनाही तोंडावर आणि मानेवर गंभीर इजा झाली होती, अशी माहिती फिर्यादी सोनकांबळे यांनी दिली होती.

गोळीबाराच्या घटनेनंतर दत्ता सामंत यांना जवळच्या अनिकेत नर्सिंग होममध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं. नर्सिंग होममध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, सुत्राद्वारे मिळालेल्या माहितीनूसार छोटा राजन याच्याविरोधात सरकारी वकिलांना कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.