सांगली:प्रतिनिधी
दि. ३१ : आमदार अनिल बाबर आपले विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आमदार होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करु शकतो हे दाखवून देणारे ते आदर्श लोकप्रतिनिधी होते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने सांगली येथील खासगी रूग्णालयात आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज खानापूर तालुक्यातील गार्डी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, माजी आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, मोहनराव कदम, दिनकर पाटील आदिंसह सर्वपक्षीय नेते, मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठी अत्यंत दुःखद असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनिल बाबर यांनी त्यांच्या मतदार संघासाठी खूप काम केले. कृषी, पाणी, रस्ते, वीज इत्यादी कामांबाबत त्यांचा पाठपुरावा नेहमी असायचा. अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. अनिल बाबर यांना पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी लोकवर्गणीतून निवडून दिले. असे देशातील एकमेव उदाहरण आहे. जनतेने प्रेम, जिव्हाळा व आत्मियता त्यांना दिली. लोकांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन प्रत्येकाला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी मदत केली. टेंभू योजनेसाठी त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. इतर राज्यातही त्यांचा मोठा जनसंपर्क होता, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार अनिल बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील विटा परिसरामध्ये तळागाळातून काम सुरु केले होते. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि चारवेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची सेवा केली. या भागात पाणी पोहोचले पाहिजे, सिंचन झाले पाहिजे या करिताचे त्यांचे प्रयत्न कोणीच विसरु शकत नाही. जनसामान्यांशी आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झाली आहे. आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत, असे ते म्हणाले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी अनिल बाबर आणि आपला चांगला स्नेहबंध होता. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी निघून गेला आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांनी आमदार अनिल बाबर यांच्या विषयीच्या आठवणी जागृत करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि अन्य मंत्रीमहोदयांसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवास पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. दिवंगत आमदार अनिल बाबर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. या शोकाकुल गर्दीच्या साक्षीनेच पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, आमदार अनिल बाबर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने सांगली येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी विटा येथील निवासस्थानी व त्यानंतर मूळ गाव गार्डी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येऊन दोन्ही ठिकाणी अंत्ययात्रा काढण्यात आली. गार्डी येथे सायंकाळी चिरंजीव अमोल आणि सुहास यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला व अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमोल व सुहास बाबर, स्नुषा, नातवंडे यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे. आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते