कडवई: मुजीब खान
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून कडवईमध्ये एज्युकेशन सोसायटी कडवई आणि गावातील महिलांच्या पुढाकारातून स्वच्छता पंधरवडा यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. गांधीजींच्या स्वच्छता आणि राष्ट्रप्रेमाच्या शिकवणीवर आधारित विविध उपक्रम घेण्यात आले.
२८ सप्टेंबर २०२४ रोजी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून भाऊ काटदरे यांनी एज्युकेशन सोसायटी कडवईच्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर व्याख्यान व कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत कंपोस्टिंग, ओला आणि सुका कचरा यांचे विभाजन, तसेच घरातील प्लास्टिकचे व्यवस्थापन कसे करावे यावर सखोल माहिती दिली.
कार्यक्रमानंतर, २ ऑक्टोबर २०२४ रोजी कडवई गावातील महिलांच्या पुढाकाराने सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी गावातील १७५ पेक्षा जास्त घरांना लाल आणि हिरव्या रंगाच्या कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून ‘स्वच्छ कडवई, सुंदर कडवई’ चा नारा दिला आणि प्लास्टिकमुक्त कडवई बनवण्याबाबत जनजागृती केली.
कार्यक्रमाच्या सांगता समारंभात उपसरपंच दत्ताराम ओकटे यांनी गावातील महिलांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक करत, हे काम ग्रामपंचायतीने करणे आवश्यक होते, मात्र आज त्यांनी एक आदर्श घालून दिल्याचे प्रतिपादन केले.
स्वच्छता चळवळ यशस्वी करण्यासाठी एज्युकेशन सोसायटी कडवईचे अध्यक्ष सादिक काझी यांचे मोलाचे योगदान लाभले. शिक्षक सामायिन खोत यांनी मेहनत घेतली, तर महिला प्रतिनिधी सीमा मोडक आणि तजिन कापडी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमात दि कडवई इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईचे मुख्याध्यापक रिजवान कारीगर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘स्वच्छ कडवई, सुंदर कडवई’ उपक्रम यशस्वी झाला.