कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. १३ : छ. संभाजीराजे यांनी १४ जुलै रोजी किल्ले विशाळगडावर शिवभक्तांना येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सर्व शिवभक्तांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे आवाहन केले आहे.
किल्ले विशाळगड परिसरात उद्या दि. १४ जुलै रोजी छ. संभाजीराजे यांनी शिवभक्तांना येण्याचे आवाहन केले आहे. छ. संभाजीराजे यांना जिल्हा प्रशासनाने चर्चेसाठी येण्याचे आवाहन यापूर्वी वेळोवेळी केले होते. जिल्हा प्रशासन आजही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे.
किल्ले विशाळगडावर कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू नये याबाबत प्रशासन दक्ष आहे. तरीही जिल्हा प्रशासनातर्फे छ. संभाजीराजे यांना पुन्हा या निवेदनाद्वारे शांततेबाबत, सहकार्य करण्याचे व चर्चेला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. किल्ले विशाळगडावर उद्या होणाऱ्या कार्यक्रमाबाबत पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवणेत आलेला आहे. अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर व उपविभागीय दंडाधिकारी, पन्हाळा व सर्व यंत्रणा संपूर्णपणे कार्यरत असून कोणताही अनूचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात येणार आहे. पोलिस विभाग व जिल्हा प्रशासन पूर्णत: दक्ष असून वेगवेगळया ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तरी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शिवभक्तांना कोठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.