पुणेः:प्रतिनिधी
दि.१ : शैक्षणिक प्रगतीसह दैनंदिन जीवनाशी संबंधित कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यावर आमचा भर राहणार असून झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम ‘ग्लोबल सिटीझन’ घडवू, असा विश्वास संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी व्यक्त केले.
सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरीटेबल ट्रस्टतर्फे मुळशी मधील रावडे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुल या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन चेअरमन संजय घोडावत यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल रावडे, मुळशी, पुणेच्या संचालक आणि मुख्याध्यापक सस्मिता मोहंती, विश्वस्त विनायक भोसले, माहिती-तंत्रज्ञान विभाग प्रमुख लकी सुराणा, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल रावडे, मुळशीचे मुख्याध्यापक मायकल पिअरसन, उपमुख्याध्यापक दुश्यंत अभिजीत आणि अर्चना पाटील, विश्वस्त फरहान अझर, मार्गदर्शक दर्पण वासुदेव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले की, येथील निवासी शाळेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण चमू समर्पित असून तुमचे पाल्य आता आमची जबाबदारी या भावनेने इथे त्यांची जडणघडण केली जाईल.
शैक्षणिक पाया मजबूत करण्याबरोबरच विविध खेळांच्या माध्यमातून त्यांच्यातील समुह भावना विकसीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. व्यक्तीमत्व अधिक खुलण्यासाठी जगतमान्य असलेले सोशीन सारखे तंत्रज्ञान वापरले जाईल. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी त्यामागे असलेल्या कष्टांची जाणीव विद्यार्थ्यांना वेळोवेळी करून देऊन कष्टाशिवाय यश नाही, हे मुलभूत महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवले जाईल.
यावेळी बोलताना सस्मिता मोहंती म्हणाल्या की, कौशल्य विकासावर अधिक भर देत भविष्याच्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाईल, अशी पिढी आम्ही इथे घडविणार आहोत. भारतीय संस्कृतीविषयी अभिमान बाळगत आपली पाळेमुळे घट्ट करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास इथे साधला जाईल.
यावेळी बोलताना विनायक भोसले म्हणाले की, आपली भारतीय संस्कृती आणि मूल्य व्यवस्था हा येथील शिक्षणाचा गाभा असेल. त्यावर आधारित नवी पिढी घडविताना प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण देखील त्यांना दिले जाईल.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवीन यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर दर्पण वासुदेव यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले.