इचलकरंजी:विजय मकोटे
दि. २४ : इचलकरंजी मधील संजय गांधी निराधार योजना कार्यालय मध्ये कायमस्वरूपी नायब तहसीलदार सह दोन कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत तसेच इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (IGM) इचलकरंजी येथे आठवड्यातून एकदा नागरिकांना अपंगाचा दाखला देण्यासाठी सिव्हील सर्जन यांना कायमस्वरूपी पाठवावेत याबाबत भारतीय जनता पार्टी व संजय गांधी निराधार योजनाचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन सादर केले आहे.
इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत. संजय गांधी कार्यालयमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय इचलकरंजी मधून दोन कर्मचारी दैनंदिन कामकाजाबाबत पाठवलेले आहेत, याठिकाणी नायब तहसीलदार, अव्वल कारकून व महसूल कारकून असे आकृतिबंध मंजूर नसल्यामुळे पदे रिक्त आहेत. या कार्यालयातून सुमारे ३५,००० लाभार्थी या निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नवीन लाभार्थी व जुने लाभार्थी यांची कुचंबना व खोळंबा होत आहे. त्यामुळे संजय गांधी कार्यालय मध्ये सदर पदे भरणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याच प्रमाणे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी फक्त छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सी.पी.आर) कोल्हापूर मध्ये दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचा दाखला देण्यात येत आहे. इचलकरंजी शहरामध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आय.जी.एम) जिल्हा उपकेंद्र आहे. याठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वयाचा दाखला देण्यात येत आहे. इचलकरंजी सह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नागरिकांना अपंगत्वाच्या दाखल्यासाठी कोल्हापूर येथील सी. पी. आर. हॉस्पिटल येथे जावे लागत आहे. सदर दाखल्यासाठी नागरिकांना किमान ०३ ते ०४ वेळेस कोल्हापूर ला जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे इचलकरंजी मधील आय.जी.एम हॉस्पिटल येथे किमान आठवडयातून एकदा सी.पी.आर चे सिव्हिल सर्जन यांनी येऊन अपंगांचे दाखले देण्यासाठी येणे गरजेचे आहे. याचा लाभ इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नागरिकांना त्याचा होणार आहे.
त्यामुळे वरील दोन्ही महत्वाच्या विषयासंदर्भात भारतीय जनता पार्टी व संजय गांधी निराधार योजनाचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन सदर केले यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आय.जी.एम) येथे अपंग दाखला देणे व संजय गांधी कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी देणे बाबत निर्णय घेण्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी व्यापारी प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष विनोद कांकानी, भाजप शहर सरचिटणीस अरविंद शर्मा, कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी संघटना जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, भाजप प्रभाग १५ अध्यक्ष प्रदीप मळगे उपस्थित होते.