कोल्हापूर:प्रतिनिधी
दि .३१ बेकायदा बांधकाम करण्यात आलेल्या मशिदीवरील कारवाईवरून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे शहरातील लक्षतीर्थ वसाहतीत दिसत आहेत. मशिदीवरील कारवाईवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी अडवल्याने मोठा तणाव निर्माण झाला .अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला. रहिवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी स्थानिकांना समजवण्याचाही प्रयत्न केला. नंतर बळाचाही वापर करण्यात आला.
.लक्षतीर्थ वसाहतीतील मशिद परिसरात बेकायदा बांधकाम करण्यात आल्याची तक्रार काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना स्थानिक रहिवाशांनी जोरदार विरोध केल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. मशिदीच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी कोर्टाने कारवाईला स्थगितीचे आदेश दिला होता. त्यामुळे मुस्लिम बांधवांना थोडासा दिलासा मिळाला होता.परंतु दोन दिवसांपूर्वी हा मनाई आदेश उठवण्यात आल्याने मशिदीच्या बेकायदा बांधकामावर हातोडा टाकण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली होती. तर दुसरीकडे, मुस्लिम बांधवांनी कारवाईवर पुन्हा स्थगिती मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी २ फेब्रुवारी रोजी आहे. महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्थानिक नागरिकांना चर्चेसाठी कार्यालयात बोलावले असता महिला आणि पुरुषांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.