इचलकरंजी –हबीब शेखदर्जी
दि .२५:येथील महेश क्लब ऑफ इचलकरंजी या समाजसेवी संस्थेच्या वतीने विविध शाळांमधील 70 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. महेश क्लब येथे संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिलडा होते. तर डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धुत, महेश सेवा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा, क्लबचे अध्यक्ष बनवारीलाल झंवर, सचिव किशोरकुमार मुंदडा, कोषाध्यक्ष महेशकुमार भुतडा, प्रोजेक्ट चेअरमन पवनकुमार लढा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क्लबचे अध्यक्ष बनवारीलाल झंवर, प्रोजेक्ट चेअरमन पवनकुमार लढा यांनी मनोगतात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना गरजू व होतकरू मुर्लीना शाळेत जाण्या-येण्यासाठी सोयीचे व्हावे, त्यांना अल्प प्रमाणात मदत व्हावी या उद्दात्त हेतुने इचलकरंजीतील 35 शाळांमधील सुमारे 70 मुलींना सायकल वाटपाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याची पूर्तता करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी मान्यवराच्या हस्ते मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी सौ. सपना आवाडे यांनी, महेश क्लबचे कार्य खरोखरच कौतुकास्पद व आदर्शवत असे आहे. अशा विविध कार्यांसोबतच मुलींमध्ये जागरूकता कशी वाढेल या विषयावर चर्चासत्र आयोजित करून सामाजिक कार्यास हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आवाडे कुटुंबिय आपल्या सदैव पाठीशी उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रणील गिलडा यांनी, क्लब या कार्याचे कौतुक करत असेच कार्य घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी संबंधित शाळांमधील शिक्षक, विद्यार्थीनी, पालक, क्लबचे सदस्य, प्रोजेक्ट सहयोगी बजरंगलाल सोमणी, सोहनलाल बांगड, रामनिवास भराडीया आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत मंत्री यांनी केले. तर आभार क्लबचे सचिव किशोरकुमार मुंदडा यांनी मानले.