शिराळा कडेगाव खानापूर-विटा मिरज तालुक्यात दुष्काळी सवलती लागू

सांगली:प्रतिनिधी

दि:०८:नोव्हेंबर: सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या चार तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शासनाने मंजुरी दिलेल्या विविध सवलती लागू करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केला आहे. हा आदेश दि. ३१ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला असून, शासनाने आदेश रद्द न केल्यास पुढील ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहील.

आदेशात जमीन महसूलात सुट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू करण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित तालुक्यामध्ये जेथे निवडणूक आचारसंहिता लागू आहे, त्या अनुषंगाने आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेशात सूचित करण्यात आले आहे.