सांगली:प्रतिनिधि
दि:०१:ऑगस्ट: माथाडी कायद्यातील प्रस्तावित सुधारणांना विरोधासाठी हमाल पंचायतीने तीव्र निदर्शने केली. बाजार समिती आवारात माथाडी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने माथाडी कामगार आंदोलनासाठी एकत्रित आले. यामुळे समितीतील व्यवहार दिवसभर थंडावले.हमाल पंचायतीचे नेते विकास मगदुम यांच्यासह वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आदींनी नेतृत्व केले. आंदोलनात हमाल, माथाडी, तोलाईदार, महिला कामगार सहभागी झाले. माथाडी मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन दिले
आंदोलकांनी सांगितले की, सध्याच्या माथाडी कायद्यात सुधारणेऐवजी नकारात्मक बदल केल्याचे दिसत आहे. विधीमंडळात विधेयकाचा मसुदा मांडण्यापूर्वी सर्वसामान्यांना माहिती दिली नाही. हरकती व सूचनाही मागवल्या नाहीत. त्यामुळे त्यामागील हेतू संशयास्पद वाटतो. नव्या कायद्यामुळे माथाडी मंडळातील लोकशाही संपुष्टात येण्याची भिती आहे. कामगारांची सुरक्षितताही धोक्यात येणार आहे. विविध संस्थांना या कायद्याची अंमलबजावणी टाळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.विकास मगदुम म्हणाले की, मंडळाच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी प्राधिकरण निर्माण करण्यात येत आहे, त्यामुळे मंडळाची स्वायत्तता संपणार आहे. विधेयक संमत केल्यास माथाडी कामगार राज्यभरात रस्त्यावर उतरुन आंदोलने करतील.
आंदोलनात बाळासाहेब बंडगर, शशिकांत नागे, बापूसाहेब बुरसे, संग्राम पाटील, नगरसेवक मनोज सरगर, शोभा कलकुटगी, शालन मोकाशी, सुलाबाई लवटे, राघू बंडगर, किरण रुपन, आदगौंडा गौंडाजे, श्रीकांत पुस्तके, प्रल्हाद व्हनमाने, राजाराम बंडगर, बजरंग खुटाळे आदी सहभागी झाले.