रत्नागिरी, दि. ५ : जिल्ह्यामध्ये सर्व पथकांची कामे चांगल्या पध्दतीने सुरु आहेत. यापुढेही विवाद होणार नाहीत. पारदर्शीपणाने आणि निर्विघ्नपणे निवडणूक पार पडेल अशा पध्दतीने सर्वांनी काम करावे, अशा सूचना सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात काल सायंकाळी जिल्हास्तरीय समन्वय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. बैठकीला सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. पाठक, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेंद्र प्रसाद मीना, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. 263-दापोली, 264-गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक सुमित के जरांगल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन विविध पथकांचा सविस्तर आढावा घेतला. सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. पाठक म्हणाले, इटीबीपीएस, पोस्टल बॅलेट, इव्हीएम, मतदार यादी यावर भर द्या. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाचे चांगल्या पध्दतीने पालन करुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामकाज करावे. सर्व कामकाजाबाबत त्यांनी स्वत: खात्री करावी. कोणतेही वादविवाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
खर्च निरीक्षक श्री. कुमार म्हणाले, अनधिकृत येणारी रक्कम अन्य बाबींवर एसएसटी, एफएसटी ने लक्ष द्यावे. तपासणी नाक्यावर तपासणी होते की नाही यावरही लक्ष ठेवावे. सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. जरांगल म्हणाले, प्रत्येक निवडणूक ही आपल्यासाठी नवीन असते. अशा पध्दतीने सर्वांनी सतर्कतेने काम करावे. निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री. मीना म्हणाले, एफएसटी, एसएसटी हे चांगले काम करत आहेत. तरीही येणाऱ्या काळात अधिक प्रभावीपणे कामकाज करावे.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनीही यावेळी निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. या बैठकीला सर्व पथकांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.