एचआयव्ही संसर्गित रूग्णांना नियमित उपचारासाठी प्रवृत्त करा

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

सांगली: महेक शेख 

दि. २ : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एचआयव्ही / एड्स च्या बाबतीत जनजागृती निर्माण करावी. ज्यांना याचा संसर्ग झालेला आहे, अशांना उपचाराचे महत्त्व सांगून नियमित उपचारासाठी प्रवृत्त करावे, इतरांनी त्यांच्याबाबत कलंक व भेदभावाची वर्तणूक करू नये व भविष्यात ते एचआयव्हीचे बळी पडू नयेत, हा एड्स जनजागृती फेरीचा उद्देश असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केले.जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हास्तरावर एच. आय. व्ही. एड्स जनजागृती फेरीचे आयोजन करण्यातआले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव व डॉ. भागवत, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.शामराव जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ उपस्थित होते.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, एड्स जनजागृतीसाठी जिल्ह्यामध्ये विविध महाविद्यालयात तसेच युवक मंडळामध्ये व्याख्याने, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. येत्या आठवड्याभरात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच यावर्षीही गेल्या वर्षी प्रमाणे एचआयव्ही संसर्गित वधू वर सूचक मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे
सांगून यावर्षीचे घोषवाक्य "TAKE THE RIGHT PATH" "मार्ग हक्काचा, सन्मानाचा" हे असल्याचे ते म्हणाले.युवकांच्या मध्ये एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून एचआयव्ही एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरूवात करण्यात आली आली. ही प्रभात फेरी पुढे आंबेडकर रोड – एसटी स्टँड – शिवाजी मंडई – हरभट रोड – राजवाडा चौक मार्गे पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक स्टेशन चौक सांगली येथे सांगता झाली. प्रभात फेरी वसंतदादा स्मारकाजवळ आल्यानंतर गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेज मिरज यांच्याकडून फ्लॅश मॉम ऍक्टिव्हिटी मधून एचआयव्ही /एड्स विषयी जनजागृती करण्यात आली.या जनजागृती प्रभात फेरी करिता सांगली जिल्ह्यातील कार्यरत 10 रेड रिबीन क्लब कार्यान्वित असणाऱ्या महाविद्यालयांना तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व एनसीसी महाविद्यालय सर्व नर्सिंग कॉलेजला निमंत्रित करण्यात आले होते. या प्रभात फेरीमध्ये 16 महाराष्ट्र एनसीसी बटालियनकडील एनसीसी चे विद्यार्थी अधिकारी उपस्थित होते.प्रभात फेरीचे नियोजन हे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सर्व स्टाफ यांनी केले. प्रभात फेरी करीता ए. आर. टी. सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरी वाटवे व ए आर टी कर्मचारी उपस्थित होते. या प्रभात फेरीकरिता सर्व स्वयंसेवी संस्था, मनपा कार्यक्षेत्रातील सर्व आयसीटीसी स्टाफ, विविध कॉलेजचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.