सांगली: महेक शेंख
दि.१४ : उज्वल भारताच्या भविष्यासाठी आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कांदे, तालुका शिराळा येथील मतदारांना आवाहन केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ च्या अनुषंगाने स्वीप मतदार जनजागृती अभियानाच्या अंतर्गत श्रीमती धोडमिसे या कांदे येथे बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील, तसेच पंचायत समितीचे अधिकारी ग्रामसेवक व महिला, नवमतदार, दिव्यांग मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शिराळा तालुक्यातील कांदे गावात भेट देऊन मतदान जनजागृतीसाठी मतदारांशी थेट संपर्क साधला. यावेळी त्यांनी भाजी-विक्रेते, दुकानदार, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला मतदार, नव मतदार यांच्याशी संभाषण करून त्यांना २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करणेचे आवाहन केले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मतदान करणे हे सुदृढ लोकशाहीसाठी किती आवश्यक आहे हे मतदारांना पटवून दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कांदे गावाच्या भेटीवेळी जिल्हा परिषद शाळा नंबर२ मुलींची शाळा येथे स्वखर्चातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. कांदे गावात ठिकठिकाणी मतदान जनजागृतीसाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक आणि घंटागाडीवर लावण्यात आलेल्या जिंगल पाहून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.