इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१५ : स्पर्धकांनी घेतलेली मेहनत, पदार्थांचा सुटलेला घमघमाट, परिक्षकांची तीक्ष्ण नजर अन् उत्कंठा वाढविणारा मनोहारी सुगंध त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र श्री किताबासाठी लागलेली चढाओढ, अशा वातावरणात सर्वांच्याच मनामनात वसलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हल २०२४चे उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले.
इचलकरंजीतील गणेशोत्सव आणि इचलकरंजी फेस्टिव्हल हे जणू एक समीकरणच बनून गेले आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून मागील २८ वर्षांपासून अखंडीतपणे इचलकरंजी फेस्टिव्हल धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे आणि फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मौश्मी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या रंगात आणि नव्या ढंगात इचलकरंजी फेस्टिव्हलच्या माध्यमातून नवनवीन स्पर्धा आणि मनोरंजनाची मेजवानी १३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत इचलकरंजीकरांसाठी उपलब्ध आहे.
शुक्रवारी सकाळी अन्नपूर्णा स्पेशल स्पर्धेने इचलकरंजी फेस्टिव्हल २०२४ चा श्रीगणेशा करण्यात आला. महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटासाठी फ्रुट डेकोरेशन आणि सोयाबीन डिश तिखट पदार्थ असे विषय देण्यात आले होते. दोन्ही गटात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी स्पधर्कांनी विविध आकारात आणि सुबकपणे साकारलेले पदार्थ प्रत्येकाचे लक्ष वेधत होते. स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. फ्रुट डेकोरेशनमध्ये माधुरी दूरगाडी (प्रथम), शबाना शेख (द्वितीय) आणि पूनम अग्रवाल (तृतीय) यांनी तर अन्नपूर्णा स्पेशल स्पर्धेत नेहा कुकरे (प्रथम), सिद्धी गंथडे (द्वितीय), प्रिया मगदूम (तृतीय) आणि मनीषा मूडसे व भूषण गाडवे (उत्तेजनार्थ)यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परीक्षण समृद्धी चौगुले, सोनाल लढ्ढे, सुजल माने या परिक्षकांनी केले. विजेत्यांना माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, सौ. मधु शिंदे व सौ. मोश्मी आवाडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.
दुपारच्या सत्रात मानाची श्री गणेशाची महाआरती माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरिक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र श्री व इचलकरंजी टॉप टेन शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी द्राक्षायणी पाटील, चंद्रशेखर शहा, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, सानिका आवाडे, नजमा शेख, चंदूर सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम, योगीता हळदे, वैशाली पाटील, रुपाली पुजारी, रेखा सारडा, निलम भराडी, शितल सूर्यवंशी, सोनाली तारदाळे, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, सपना भिसे, अंजुम मुल्ला, सीमा कमते, नंदा साळुंखे, जयश्री शेलार, शोभा कापसे, दिपाली लोटे, अक्षय हजारे, संग्राम सटाले, मुजम्मिल सय्यद, सत्येन राजमाने, प्रतिक साठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.