इचलकरंजी:विजय मकोटे
दि. १५: उद्योग, व्यवसायाबरोबरच कला व सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राची समृद्ध परंपरा असलेल्या इचलकरंजी नगरीत दीर्घ कालावधीनंतर शास्त्रीय आणि उपशास्त्रीय नृत्याचा ‘कथ्थक नृत्यांजली’ हा अभिजात कार्यक्रम रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४•३० वाजता येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये होणार आहे. येथीलच पदन्यास नृत्यकला अकादमीच्या सौ. आर्या अनिरुद्ध चांदेकर, सौ. पल्लवी प्रसाद खैरनार, सौ. धनश्री अभिजीत होगाडे, कु. मधुरा प्रसाद रानडे, कु. आदिती प्रवीण चिकोर्डे, कु. सिद्धी सुभाष भस्मे व कु. साक्षी संजय बारवाडे या सातजणी हा कार्यक्रम नृत्यगुरु सौ. सायली होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करणार आहेत.
शास्त्रीय नृत्याच्या प्रवासातील ‘कथ्थक नृत्यांजली’ कार्यक्रम हा एक महत्त्वाचा टप्पा असून अशा प्रकारचा कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणीच आहे. हा कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व नृत्य कलाकारांनी सायली होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाची कथक नृत्य विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. या सर्व कलाकारांनी शहरातील तसेच महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून, महोत्सवातून सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर विद्यापीठ स्तरावर आणि राज्य पातळीवरील अनेक स्पर्धांमधूनही त्यांनी यश प्राप्त केले आहे.
कथ्थक हा उत्तर भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार असून इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याची माहिती आणि आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमासाठी ओमप्रकाश दिवटे (आयुक्त व प्रशासक इचलकरंजी महानगरपालिका), सौ. मौसमी चौगुले (प्रांताधिकारी, इचलकरंजी), अशोकराव सौंदत्तीकर (अध्यक्ष, पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ), डॉ. सपना आवाडे (मानद सचिव, डिकेटीई सोसायटी) आणि शामसुंदर मर्दा (कार्यकारी विश्वस्त, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन) हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पदन्यास नृत्यकला अकादमी ही संस्था इचलकरंजी शहरात गेली २८ वर्षे कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर करण्यात येत आहे.
सदरच्या ‘कथ्थक नृत्यांजली’ कार्यक्रमात गणेश वंदना, शिव स्तुती, मत्त ताल, अभंग, ठुमरी, शिखर ताल, गझल, फ्युजन आणि जुगलबंदी असे विविध तालबद्ध नृत्यप्रकार सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन सायली होगाडे यांचे असून सौ. गौरी पाटील आणि विवेक सुतार यांचे गायन आहे. याचबरोबर श्रीधर पाटील (हार्मोनियम), राजू पाटील (तबला), अंबरीश कुडाळकर (पखवाज), केदार गुळवणी (सतार व व्हायोलिन), स्नेहल जाधव (ऑक्टोपॅड व ड्रमसेट) संग्राम कांबळे (सिंथेसायझर) आणि सर्जेराव कांबळे (बेस गिटार) हे प्रसिद्ध वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. निवेदनाची जबाबदारी सौ. चित्कला कुलकर्णी यांनी सांभाळली आहे.
आपल्या देशातील शास्त्रीय नृत्यांमध्ये कथ्थक, भरत नाट्यम, मोहिनी अट्टम, कुचीपुडी, कथकली, मणीपुरी व ओडिसी असे सात प्रमुख प्रकार असून महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमधून या शास्त्रीय नृत्य कलेचा चांगला प्रसार होत आहे. आपल्या भागातही, आपल्या समृद्ध संस्कृतीचा एक भाग असलेल्या शास्त्रीय नृत्य कलेविषयी आकर्षण निर्माण व्हावे हा उद्देशही या सादरीकरणामागे आहे. नृत्याची आवड असलेल्या रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नृत्य सादरीकरण करणाऱ्या सर्व कलाकार, नृत्यगुरु आणि निमंत्रक अनिरुद्ध चांदेकर, प्रसाद खैरनार, अभिजीत होगाडे, प्रा. प्रसाद रानडे, प्रवीण चिकोर्डे, सुभाष भस्मे, संजय बारवाडे व संजय होगाडे यांनी संयोजक समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत बोलताना केले.