सांगली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

सांगली :प्रतिनिधी 

दि. १५  : बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बालन्याय व बालकांचे संरक्षण कायदा 2015 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा या विषयाचे कायदेविषयक शिबीर सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व ज्यु कॉलेज कुपवाड, सांगली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.

            या शिबीर कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा निवेदिता ढाकणे, पॅनेल विधिज्ञ मुक्ता दुबे, शाळेचे संचालक बादल उपाध्ये, सचिव रितेश शेठ, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

            जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थीनींमध्ये जावून गुड टच, बॅड टच काय असतो याची छोटीशी लघुनाटिका शाळेतील मुलींसोबत सादर केली. मुलींनी कोणत्याही वाईट प्रवृत्तीच्या लोकाना सामोरे जाताना घाबरून न जाता प्रत्येक समस्येचा धाडसाने मुकाबला करावा व वाईट प्रवृत्तीचा नायनाट करण्याबाबत सुचित केले. कायदा सर्वस्वी तुमच्या करीता व तुमच्या कल्याणाकरीताच आहे याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम या कायद्याविषयी महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव यांनी माहिती दिली. तसेच मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती देवून वाईट लोकांपासून मुलींनी आपले संरक्षण कसे करावे व काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा निवेदिता ढाकणे यांनी बाल न्याय व बालकांचे संरक्षण कायदा या विषयी माहिती दिली. पॅनेल विधिज्ञ मुक्ता दुबे यांनी बालकांचा हक्क, शिक्षणाचा हक्क व बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या विषयावर मार्गदर्शन केले.

            स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य एस. जी चिरमे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती एस. बी. चौगुले यांनी केले. आभार विजय कोगनोळे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग व कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी बहुसंख्यने उपस्थित होते.