कडवईत वरदान क्रीडा मंडळाच्या वतीने ४० वा नवरात्र उत्सव संपन्न

 

कडवई: मुजीब खान 

संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे वरदान क्रीडा मंडळाच्या वतीने यंदा नवरात्र उत्सवाचे ४० वे वर्ष साजरे केले जात आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंडळाने दुर्गामातेची अत्यंत सुबक मूर्ती स्थानापन्न केली आहे. नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून, मंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवामध्ये भक्तिरस भरलेले भजन, गरबा, फनी गेम्स, चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर केले जातात. नवरात्रातील प्रत्येक दिवशी आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते, ज्याची जबाबदारी मंडळातील दोन सदस्य संभाळतात. याचप्रमाणे, जागरणाची जबाबदारीदेखील दररोज दोन सदस्यांना सोपवली जाते.

या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष भय्या प्रसादे, उपाध्यक्ष संतोष गुरव, आणि सचिव सिकंदर कापडी विशेष मेहनत घेत आहेत. त्यांना सर्व सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभले असून, नवरात्र उत्सवाची धामधूम संपूर्ण गावात अनुभवली जात आहे.