इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .१५: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास (दिंडोरी प्रणित) नदी वेस नाका, इचलकरंजी यांचे वतीने श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह मंगळवार दि. १९ डिसेंबर ते बुधवार २७ डिसेंबर २०१३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सद्गुरू प. पू. आण्णासाहेब मोरेदादा यांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ तत्व सर्वसामान्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केला आहे. बालसंस्कार व युवा प्रबोधन 18 सूत्री ग्रामअभियानाद्वारे मानव घडविणे, सन्मार्गाला लावणे आणि राष्ट्राचा विकास साधने याप्रमाणे कार्य सुरु आहे. सप्ताह कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रहर सेवा (अखंड विणावादन, जप, श्री स्वामीचरित्र वाचन) अखंडपणे सुरू असणार आहे. श्री गणेश याग, गीताई याग, स्वामी याग, चंडी याग, रुद्र याग, मल्हारी यागासह विविध यज्ञ संपन्न होतील. सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण करण्याची संधी प्राप्त होणार आहे. सामूहिक श्री स्वामीचरित्र सारामृत व श्री दुर्गा सप्तशती पाठ, औदुंबर प्रदक्षिणा, सप्ताह दरम्यान बालसंस्कार, प्रश्नोत्तर मार्गदर्शन, विवाह संस्कार, कृषी, पर्यावरण प्रकृती, स्वयंरोजगारसह विविध विभागांचे प्रदर्शन, श्री जनकल्याण योजना स्टॉल, श्री क्षेत्र पीठापुर अन्नदान स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना, नागरिकांना, स्वामी भक्तांना याचा लाभ होणार आहे.