पुणे : प्रतिनिधी
दि. 29 जुलै: नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा क्षयरोग दुरीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.
पुणे येथे उभारण्यात आलेल्या टी.बी. वॉर रूमचे उद्घाटन आरोग्य सेवा आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ. रामजी अडकेकर, सी.एच.आई फांऊडेशनच्या श्रीमती अनन्या व बी.एम.जी.एफ फांऊडेशनचे डॉ.संदीप भारस्वाडकर, डॉ.समीर कुमटा यांची उपस्थिती होती.
डॉ.रामास्वामी एन. म्हणाले, क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योग्य नियोजन, संनियंत्रण व पाठपुरावा करून कार्यक्रम गाव पातळीपर्यंत पोहचण्यासाठी शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र प्रयत्न करावा. २०२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे.
केंद्रीय क्षयरोग विभागाकडे सुसज्ज वॉर रूम उपलब्ध असून राज्यस्तरावर असे वॉर रूम तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बिल मेलिंडा गेट्स फांऊडेशन व क्लिंटन हेल्थ एक्सेस इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने या वॉर रूमची उभारणी करण्यात आली आहे.
क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निगडित सर्व डेटा तयार करण्यात येऊन कार्यक्रमात येणाऱ्या अडी-अडचणी, नियोजन व सहयोगी विचारमंथन करून त्यातून कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनासाठी याची मोठी मदत होणार आहे. यात खाजगी, शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यांचा आढावा घेऊन त्यानुसार कार्यप्रणाली अद्यावत करण्यावर भर देऊन, जिल्हे व तालुके यांच्याशी व्यक्तिगत संवाद होऊन दैनंदिन कामकाजात गतिमानता येऊन गुणवत्ता सुधारण्यास व कृती करण्याकडे कल निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या वॉर रूममुळे क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हा जिल्हा, तालुका व गाव पातळीवर अधिक सक्षम होणार असून नियोजन अंमलबजावणी, शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आणि संनियंत्रण पाठपुरावा यासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रम संयोजन सहसंचालक डॉ.रामजी आडकेकर यांनी केले, श्रीमती मुक्ता अरोरा यांनी आभार मानले.