मुंबई:प्रतिनिधि
दि:२९:मे:संजय राऊत यांनी लोकसभा जागा वाटपाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाकडून वारंवार 18 जागांवर दावा करण्यात येत आहे. पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळं चर्चेला उधाण आलं आहे.
‘कसेल त्याची जमिन या प्रमाणे..जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी आपलं हे ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टॅग केलं आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीकडून वारंवार पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवर दावा करण्यात येत आहे. अजित पवार यांनी पुण्याच्या पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया देताना पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवताना महाविकास आघाडी अंतर्गत चर्चा करू असं म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल. पुणे शहर व जिल्ह्यात नेहमीच आमची ताकद राहिली आहे. त्यामुळे ती जागा कोणाला सोडणे हा वाद होऊ शकत नाही. निवडणुकीची रणनिती ठरवताना जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या नव्या ट्विटमुळे आता पुण्याची जागा राष्ट्रवादीला जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.