पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा

अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं या

पुणे:प्रतिनिधी

दि:२९:मे :पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. त्यामुळे लोकसभेची ही जागा राष्ट्रवादीला देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यावर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, येत्या दोन जून रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये या जागेबाबत निर्णय घेतला जाईल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण

पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या दोन जून रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये या जागेबाबत निर्णय घेतला जाईल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान जनताच जमालगोटा देऊन विरोधकांच्या पोटदुखीचा इलाज करेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावरून अशोक चव्हाण यांनी जोरदार टोला लगावला आहे, मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याचं त्यांनी म्हटलं.

अजित पवार यांनी पुण्याच्या पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया देताना पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवताना महाविकास आघाडी अंतर्गत चर्चा करू असं म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल. पुणे शहर व जिल्ह्यात नेहमीच आमची ताकद राहिली आहे. त्यामुळे ती जागा कोणाला सोडणे हा वाद होऊ शकत नाही. निवडणुकीची रणनिती ठरवताना जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे