संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, मुळशी, पुणेला ‘प्रथम क्रमांकाची उदयोन्मुख निवासी शाळा’ पुरस्कार

पुणे :प्रतिनिधी 

दि .२६ :मुळशी येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘मिड-डे एज्युकेशन स्कूल’ने केलेल्या सर्व्हेनुसार पुण्यातील ‘प्रथम क्रमांकाची उदयोन्मुख निवासी शाळा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. पुण्यात झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्री उपस्थित होते. अभिनेत्री इंदिरा कृष्णन, अभिनेता मृत्युंजय ठाकूर, अभिनेत्री इशिका विश्वास, अभिनेत्री सादिया खान, आणि मिड डे इन्फो मीडिया उपाध्यक्ष श्री मुकेश शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणेचे प्राचार्य पौरुशस्प कारकारिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुरस्काराच्या निमित्ताने प्राचार्य पौरुशस्प कारकारिया यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या श्रीमती सस्मिता मोहंती, विश्वस्त श्री विनायक भोसले, आणि अध्यक्ष श्री संजय घोडावत यांचे आभार व्यक्त केले. तसेच ते म्हणाले, “संचालिका प्राचार्या मोहंती यांच्या कुशल व्यवस्थापनामुळेच शाळेला हा सन्मान मिळाला आहे.”

या प्रसंगी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल निवासी स्कूल सुरू करण्यात आले आहे. त्याला विद्यार्थ्यांचा व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या सातत्यपूर्ण चांगल्या कार्यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण या गोष्टींमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.”