शिवगर्जना महानाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सादरीकरणाचा आज शेवटचा दिवस

सांगली:प्रतिनिधी 

दि.४: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवगर्जना महानाट्य सादरीकरणास दि. ३  फेब्रुवारी रोजी सांगलीत प्रारंभ झाला. हे महानाट्य पाहण्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.५  फेब्रुवारी सादरीकरणाचा शेवटचा दिवस असून, सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.  

        

        या महानाट्याच्या आजच्या सादरीकरणाच्या दुसऱ्या दिवशी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे,  महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, दिग्दर्शक स्वप्नील यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शासनाच्या वतीने शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक ३  फेब्रुवारी पासून संध्याकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर होत असून ५  फेब्रुवारी हा सादरीकरणाचा शेवटचा दिवस आहे.

            १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्यात मांडण्यात आला आहे. या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून सर्व जिल्हावासियांनी याचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

            या महानाट्यामध्ये २५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे. चित्त थरारक लढाया, रोमांचकारी प्रसंग, एक धगधगत्या इतिहासाची आठवण, नेत्रसुखद आतषबाजी, तीन तासात संपूर्ण शिवचरित्राचे दर्शन, लक्षवेधी दिग्दर्शन, मंत्र मुग्ध संगीत, नेत्रदीपक प्रकाशयोजना, आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड ही या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत.