शिरोळ :राम आवळे
दि .१४ : भाजपप्रणित महायुती सरकारने देशात व राज्यात जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारने जाती-जातीत भांडणे लावून देशाची विभागणी करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातला नेऊन जनतेचे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला साथ द्यावी. असे आवाहन कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी शिरोळ येथील पत्रकार परिषदेतून केले.
शिरोळ विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री एम.बी पाटील यांनी शिरोळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार, काळा पैसा बाहेर काढून तो पैसा पंधरा लाख रुपये प्रमाणे जनतेच्या खात्यावर वर्ग करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी अनेक फसवी आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपा सरकारने दिलेली आश्वासने त पूर्ण केली नाहीत. यामुळे महायुती सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष पसरला आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली. कर्नाटक सरकारने लागू केलेल्या योजनेची कॉपी करून त्या योजना महाराष्ट्र राज्यात भाजपा सरकारने सुरू करून जनतेचे दिशाभूल केली आहे. पण महाराष्ट्र राज्यात महिला सुरक्षितेचा प्रश्न गंभीर आहे दिवसा महिलांच्यावर अत्याचार होत आहेत. मंत्र्यांची मुलं जनतेच्या अंगावरून गाड्या घालत आहेत. राज्यात उद्योगधंदे नसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. महागाई गगनाला भिडली आहे. केवळ पोकळ आश्वासनाची खैरात या सरकारकडून केली जात आहे. यामुळे राज्यातील जनता सुरक्षित राहिलेली नाही. याकरिता पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याकरिता उमेदवार व चिन्ह न पाहता महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करून, महाराष्ट्र राज्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी साथ द्यावी. असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की देशाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग असतानाच देशाची अर्थव्यवस्था भक्कम व मजबूत करण्यात आली होती. यामुळेच जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत देश सध्या पाचव्या क्रमांकावर आहे तो चौथ्या क्रमांकावर न्यायचा असेल तर महाविकास आघाडीचीच सत्ता येणे काळाची गरज आहे. गेल्या दोन महिन्यापासून पक्ष निरीक्षक या नात्याने मी पश्चिम महाराष्ट्रात फिरत आहे जनतेत परिवर्तनाचा विचार असल्यामुळे महाविकास आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिरोळ तालुक्याच्या विकासात स्व. माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्यामुळे शिरोळ तालुका व सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. स्वच्छ चेहरा चरित्र संपन्न नेतृत्व विकास कामाची दृष्टी आणि नैतिकतेचे राज समाजकारण करणाऱ्या गणपतराव पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करावे असेही त्यांनी आवाहन केले आहे.
माजी आमदार सौ अंजली निंबाळकर बोलताना म्हणाल्या की महाराष्ट्र राज्यातील महिला सुरक्षित नाही. ज्या महिलांनी देशाचे नाव उज्वल केले त्या महिलांचा भाजपा सरकारने अपमान केला. महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पक्षात सामील करून घेतले. अशा भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे. लाडकी बहीण योजना कर्नाटकात काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा लागू केली त्याच पद्धतीने हिमाचल प्रदेश, तेलंगणा या राज्यातही काँग्रेस पक्षांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. यामुळे जनतेत काँग्रेस पक्षाबद्दल सहानुभूती व आदराची भावना निर्माण झाली आहे. याची धास्ती घेऊन महाराष्ट्र राज्यातही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मात्र त्या राज्यातील महिला व लहान मुलांची सुरक्षितता गंभीर बनली आहे. याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कर्नाटक राज्यात पाच योजना जनतेसाठी सुरू केले आहेत. त्याच योजना काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यात सुरू करणार आहे. यामुळे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आंध्रप्रदेश राज्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व निरीक्षक साके शैलजानाथ माजी मंत्री व आमदार प्रकाश हुक्कीरे आमदार राजू कागे, आमदार बी आर पाटील, माजी मंत्री व माजी आमदार वीरकुमार पाटील, ए बी पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जयसिंगपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमरसिंह निकम, शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मिनाज जमादार महिला जिल्हा उपाध्यक्षा योगिता घुले, शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना चौगुले, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे, प्रतिकसिंह जगदाळे, राजेंद्र कांबळे, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मधुकर पाटील, मुस्लिम ओबीसी संघटनेचे दिलीप कलावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते