इचलकरंजी: वि जय मकोटे
-दि १२: संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची २१ हजार उत्पन्नाची मर्यादा ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठीच्या उत्पन्न मर्यादाप्रमाणेच करावी, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांच्या मुलांसाठीची २५ वर्षे वयाची अट रद्द अध्यादेशाची पूर्णत: अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आमदार राहुल आवाडे यांना संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने देण्यात आले. दरम्यान, या संदर्भात आपण शासन दरबारी पाठपुरावा करुन लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी शिष्टमंडळास दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत निराधारांना दरमहा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान दिले जाते. परंतु या योजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेली २१ हजार उत्पन्नाची अट ही लाभ मिळण्यात अडचणीची ठरत आहे. यासह विविध मागण्यासंदर्भात बुधवारी संगांयो च्या शिष्टमंडळाने आमदार राहुल आवाडे यांची भेट घेतली.
निवेदनात, अनुदानासाठी असलेली २१ हजार उत्पन्नाची अट रद्द करुन उत्पन्नाची मर्यादा ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेप्रमाणे करण्यात यावी, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांची मुले २५ वर्षाची होईपर्यंत लाभ दिला जात होता. मुले २५ वर्षाची झाल्यानंतर अनुदान बंद होत होते. परंतु राज्य शासनाने यामध्ये बदल करत ५ जुलै २०२३ रोजीच्या अध्यादेशानुसार मुलांच्या २५ वर्षे वयाची अट रद्द केलेली असून विधवा आणि दिव्यांगांना पूर्ववत अनुदान सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु संगांयो कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी ही अध्यादेशानंतरच्या नवीन प्रकरणात केली जाईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे जुने पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे शासन अध्यादेशानुसार सर्वांनाच पूर्ववत अनुदान सुरु करण्यात यावे. त्याचबरोबर संगांयो इचलकरंजी कार्यालयात लाभार्थ्यांच्या मानाने अत्यंत अपुरा स्टाफ असल्याने कामे प्रलंबित रहात आहेत. त्यामुळे याठिकाणी तातडीने १ नायब तहसिलदार, २ क्लार्क व २ अव्वल कारकुन अशी पदे तातडीने भरावीत. या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करुन लाभार्थ्यांना न्याया द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात संगांयो समितीचे सदस्य कोंडीबा दवडते, सुखदेव माळकरी, रमेश पाटील, रघु हाळवणकर, अनिल शिकलगार, सचिन हेरवाडे, रवी मिणेकर, कल्पना जाधव, बाळाबाई तोरणे आदींचा समावेश होता.