इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि . ०२ जानेवारी. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगास चालना मिळावी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वस्त्रोद्योजकांना मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्सिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टेक्सपोजर – २०२४‘ या टेक्सटाईल मशिनरी प्रदर्शनाचे भव्य आयोजन दिनांक ०७ जानेवारी ते १० जानेवारी २०२४ रोजी पंचरत्न सांस्कृतिक भवन, इचलकरंजी येथे केलेले आहे.या प्रदर्शनात नामवंत कंपन्याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे २२० स्टॉलचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनास मुंबई, अहमदाबाद, सुरत, बेंगलोर, दिल्ली, पूणे, कोईमतूर, सोलापूर, भिवंडी, ठाणे इ. ठिकाणाहून वस्त्रोद्योजक भेटी देणार आहेत. तसेच परदेशातून जपान, जर्मनी, स्विर्त्झलँड, इटली, बेल्जीयम,चीन इ. या देशातील तज्ञ मंडळी भेट देणार आहेत.
या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार धैर्यशिल माने, आमदार प्रकाश आवाडे, टेक्स्टाईल कमिशनर मुंबई श्रीमती रुप राशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकाचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१७० चे प्रांतपाल रो. नासिर बोरसदवाला तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच या प्रदर्शनास ०८ जानेवारी रोजी उच्च आणि तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री, मा.ना. चंद्रकांतदादा पाटील भेट देणार आहेत.
इचलकरंजी या शहराची ओळख महाराष्ट्राचे सुप्रसिध्द वस्त्रोद्योग केंद्र म्हणून आहे. या शहरामध्ये अत्यंत वेगाने निर्माण होणारा विकेंद्रीत वस्त्रोद्योग प्रसिध्द आहे. पारंपारिक कापड उत्पादनाशिवाय नवनविन गुणवत्तेच्या वस्त्रांचे शटललेस लूमवर इचलकरंजी मध्ये आज मोठया प्रमाणावर उत्पादन केले जात आहे. इचलकरंजी परिसरामध्ये २० हजार शटललेस लूम सध्या कार्यरत आहेत. त्याशिवाय १ लाख साधे पॉवर माग, १६० सायझिंग युनीटस, ७५ प्रोसेसिंग व १०० गारमेंट उत्पादन करणारे युनिटस आहेत. इचलकरंजीमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने व इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी आवश्यक पोषक वातावरण असल्यामुळे येथे हायटेक टेक्स्टाईल पार्क्स व गारमेंट पार्कस प्रस्थापित झाले आहेत.
जागतिक स्तरावर होत असलेले वस्त्रोद्योगातील विविध बदल व त्या संबंधी वस्त्रोद्योगांनी करावयाची तयारी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. या विषयावर विविध तज्ञंामार्फत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी डीकेटीई मार्फत सातत्याने चर्चा सत्रे, कार्यशाळा तसेच परिषदांचे आयोजन केलेे जाते. अशा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टेक्स्पोजर – २०२४‘ या यंत्रसामुग्रीच्या प्रदर्शनाचेे आयोजन इचलकरंजी येथे केलेले आहे.
या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक शॉक रिडस -इटली, सह प्रायोजक कोबेल्को कॉम्प्रेसर- जपान, तसेच जुपिटर इंडिया, पिकेनॉल – बेल्जियम आणि दी इचलकरंजी इंडस्ट्रीयल को.ऑप इस्टेट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनामध्ये टोयोटा जपान, कलरजेट, प्रशांत वेस्टपॉईंट, लुवा, इंगंरसोलरेंड यांच्यासोबत अनेक नामांकित कंपन्याचे स्टॉल असतील.
वस्त्रोद्योगाचे उद्योजक, यंत्रमागधारक – कारखानदार, व्यावसायिक, मशिनरी सप्लायर्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञ, संशोधक, वस्त्रोद्योग शिक्षण तज्ञ व विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट देउन या संधीचा लाभ घ्यावा असे अवाहन डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे व रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडा यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस डीकेटीईचे संचालिका डॉ. एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष नितिनकुमार कस्तुरे, प्रोजेक्ट कमिटी चेअरमन पुरुषोत्तम बोहरा आदि उपस्थित होते.