त्यांना अशी भाषा शोभते’, मुख्यमंत्री शिंदेंना असं का म्हणाले

शरद पवार ?

नवी दिल्ली:प्रतिनिधि

दि:२८:मे:नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून विरोधकांवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर शरद पवारांनी पटलवार केला आहे. विरोधकांना जनता जमालगोटा देईल, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा शरद पवार आणि अजित पवारांनी समाचार घेतला आहे, त्यामुळे जमालगोट्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

 

मोदी साहेब नंबर एकला आले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, त्यामुळे अनेकांना पोटदुखी झालेली आहे. पोटदुखी झालेली आहे त्यांना या देशातली जनता जमालगोटा देईलच,’ असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला. नव्या संसद भवनाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला, तसंच या सोहळ्यावर बहिष्कारही घातला. यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर शरद पवारांनी निशाणा साधला. तशाप्रकारची भाषा त्यांना शोभते, त्यामुळे भाष्य करण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले. तर दुसरीकडे अजित पवारांनीही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांनी कसं बोलायचं असतं याचे संस्कार आपल्यावर केले आहेत. जमालगोटा वगैरे शब्द मुख्यमंत्र्यांना पटतात का? जनतेने कर्नाटकमध्ये सांगितलंच आहे, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

शरद पवार आणि अजित पवारांनी टीका केल्यानंतर सत्ताधारी सावध झाले आहेत. जमालगोटाचा वाद वाढताना पाहून मंत्री शंभुराज देसाई पुढे आले. मुख्यमंत्री ग्रामीण भागातले असून त्यांच्या शब्दांचं भांडवल करू नये, असं शंभुराज देसाई म्हणाले