शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थिती

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ; आज आणि उद्याही मोफत प्रयोग

कोल्हापूर,:प्रतिनिधी

दि.१३:- शहरातील महात्मा गांधी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या जीवनकार्यावर आधारीत शिवगर्जना महानाट्यातील रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी कोल्हापूर व परिसरातील हजारो शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली. या भव्यदिव्य महानाट्याचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी रयतेचे राज्य कसे असावे याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला, असे सांगून शिवरायांचे कार्य रयतेच्या कल्याणासाठी होते आणि हाच इतिहास आपण ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त होणाऱ्या या महानाट्यातून पाहत आहोत, असे ते यावेळी म्हणाले. त्यांनी पुढील दोन होणाऱ्या महानाट्याच्या प्रयोगासाठी आपले नातेवाईक तसेच मित्र परिवारासह उपस्थित राहण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवरायांचे कार्य, त्यांचे विचार आपल्याला दैनंदिन कामात, अडीअडचणीत मदत करीत असल्याचे सांगून शासनाच्या मदतीने आपण शिवरायांचे कार्य जिवंत देखाव्यातून पाहत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांचा व्हिडीओ संदेश स्क्रीनवर उपस्थितांना दाखविण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करुन देण्यासाठी 3 प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होत आहे. आज आणि उद्याही याच ठिकाणी मोफत प्रयोग होणार आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असून पहिल्याच दिवशी शिवप्रेमींनी तुफान गर्दी केली. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांच्या शामियानाला टाळ्यांची दाद मिळाली. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य पाहून ऐतिहासिक प्रसंग जसेच्या तसे घडत असल्याचे जाणवत होते. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही झाली. तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घालत कलाकार, महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव, दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी कोल्हापूरकरांना 12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत संपूर्ण इतिहास विविध प्रसंगातून दाखविला.

महाराष्ट्र गीताने सुरुवात झालेल्या या महानाट्याच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहायक संचालक श्वेता पवार, दिग्दर्शक स्वप्नील यादव, निर्मात्या रेणुका यादव, अतिरिक्त आयुक्त रवीकांत अडसूळ व केशव जाधव, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आशिया खंडातील भव्य दिव्य महानाट्य शिवगर्जनाचे आयोजनत कोल्हापूरमध्ये करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी महानाट्य सुरु होण्याआधीपासून दर्शकांनी गर्दी केली. 10 हजार दर्शकांची व्यवस्था केलेल्या महात्मा गांधी मैदानावर काही वेळातच सर्व खुर्च्या भरुन गेल्या. विद्यार्थी, युवा, तरुण, महिला, पुरुष व वयोवृद्ध अशा सर्व वयोगटातील शिवप्रेमी पहिल्या दिवशी महानाट्याचे साक्षीदार झाले. शिवरायांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याने विविध ऐतिहासिक प्रसंगातून शासनाकडून शिवरायांवरील महानाट्य प्रत्येक जिल्ह्यात मोफत नागरिकांना दाखविण्यात येत आहे.