सांगली:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी तालुका स्तरावर २० डिसेंबर २०२३ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. सदर प्रस्ताव दिनांक २२ डिसेंबर २०२३ पर्यंत तालुकास्तरावरून जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय वृध्द कलावंत व साहित्यिक मानधन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या समितीची बैठक समितीचे अध्यक्ष विजयदादा कडणे व सदस्य सचिव तथा जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह समितीच्या सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत सन २०२२-२३ मधील अर्जाची छाननी व मंजुरी तसेच, सन २०२३-२४ मधील कलाकार प्रस्ताव मागणी संदर्भात चर्चा करण्यात आली.
बैठकीत सन २०२२-२३ मध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४६६ कलाकार प्रस्तावांची प्राथमिक पडताळणी करण्यात आली. सदर प्रस्तावांवर अंतिम मंजुरीची कार्यवाही पुढील बैठकीत करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजने अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी परिपूर्ण प्रस्ताव तालुका स्तरावर दिनांक ८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ अखेर सादर करण्यात यावा, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सदर प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण विभाग जि.प. सांगली यांच्याकडे दिनांक २२ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात यावेत.
प्रस्तावासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडण्यात यावीत.
१) विहित नमुन्यातील अर्ज २) ५० वर्षापेक्षा जास्त वय असल्याबाबत वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक) ३) उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला (र. रु. ४८०००/- पर्यंत) ४) राष्ट्रीय, राज्य, आकाशवाणी व जिल्हा स्तरावरील १५ वर्ष कलाक्षेत्रातील सर्व पुरावे ५) रेशनकार्ड झेरॉक्स, अर्जदार किमान १५ वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबत प्रमाणपत्र ६) इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबत १०० रु. स्टँपवर नोटरी केलेले प्रतिज्ञापत्राची प्रत ७) कलाकाराचे आधार लिंक केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स (वैयक्तिक खाते) ८) दूरध्वनी क्रमांक व आधार कार्डची झेरॉक्स ९) मा. जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या वाङ्मय विषयक अथवा कला विषय नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थांचे शिफारसपत्र जोडावे, तसेच नामांकित संस्था/व्यक्तीचे शिफारस पत्र इत्यादी, इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही.