नमन, जाखडी लोककलांसह महासंस्कृती महोत्सवात होणार विविध कार्यक्रम ११ ते १५ फेब्रुवारी होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

-पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी:सचिन पाटोळे 

दि. ४  : ११ ते १५ फेब्रुवारी रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनाबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज
स्टेडीयममध्ये बैठक घेतली. बैठकीला एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन शर्मा, जि. प. चेमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत आदी उपस्थित होते.

११ फेब्रुवारी रोजी मराठी बाणा, १२ फेब्रुवारी रोजी महानाट्य शिवबा, १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची संस्कृती, १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची लोकधारा आणि १५ फेब्रुवारी रोजी अवधुत गुप्ते यांचा संगीत प्रधान कार्यक्रम होणार आहे. यावेळी स्थानिक कलाकरांच्या माध्यमातून दररोज नमन, जाखडी अशा लोककलांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांनी येणाऱ्या कलाकारांच्या निवास तसेच सादरीकरणाबाबत त्यांना लागणाऱ्या यंत्रणेविषयी सूचना केल्या. २५ बचत गटांच्या स्टॉल सोबतच खादी ग्रामोद्योग, पर्यटन विभागाचे स्टॉल उभे करावेत. शिक्षण विभागाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करावी. त्याचबरोबर सांस्कृतिक चिन्ह स्पर्धा घेण्यात यावी, असेही ते म्हणाले. या पाच दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवासाठी जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवून याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.