निवेदन व सूत्रसंचालन कार्यशाळा संपन्न विघ्नेश जोशी यांचे मार्गदर्शन

इचलकरंजी:प्रतिनिधि

दि:३१:जुलै: इचलकरंजी येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रोटरी क्लब सेंट्रल व रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह आणि मनोरंजन मंडळ युवक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत कार्यशाळा’ चांगल्या प्रकारे पार पडली. सुप्रसिद्ध नाट्य व मालिका अभिनेते, निवेदक विघ्नेश जोशी – ठाणे यांनी सदरच्या कार्यशाळेत अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

 

यावेळी बोलतांना जोशी यांनी “कोणत्याही कार्यक्रमात व समारंभात निवेदक अथवा सूत्रसंचालक हा महत्त्वाचा घटक असतो. त्याच्यामुळे कार्यक्रम योग्यरीत्या पार पडण्यास मदत होत असते. निवेदन व सूत्रसंचालन ही एक कला आहे, त्याचबरोबर व्यवसाय म्हणूनही या कलेचा उपयोग करता येतो. उत्तम निवेदक व सूत्रसंचालक होण्यासाठी भरपूर वाचन, भाषेचा अभ्यास, स्पष्ट शब्दोच्चार, समय सूचकता व प्रसंगावधान, इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. त्याचबरोबर या कलेचा सातत्याने सराव ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे.” अशा आशयाचे प्रतिपादन केले.

 

कार्यशाळेच्या सुरुवातीला विघ्नेश जोशी तसेच हिराचंद बरगाले, राजन मुठाणे, वैशाली नायकवडे, संजय मेटे आणि दत्ता टोणपे या सर्व संस्था प्रतिनिधींच्या हस्ते उदघाटन पर दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी संतोष आबाळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.

 

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात जोशी यांनी निवेदन, सूत्र संचालन व मुलाखत त्याचबरोबर उदघोषणा या सर्वांची माहिती आणि अनेक उदाहरणे दिली. निवेदन व सूत्र संचालन करताना कोणती पथ्ये पाळावीत, कोणती दक्षता घ्यावी याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात त्यांनी सहभागी शिबिरार्थींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली त्याचबरोबर कार्यक्रम करताना आलेले विविध प्रकारचे अनुभव सांगितले.

 

सदरच्या कार्यशाळेत इचलकरंजी व परिसर तसेच सांगली येथील ४५ सदस्यांनी सहभाग घेतला. शेवटी विघ्नेश जोशी असेच रोटरी प्रांत ३१७०चे नियुक्त प्रांतपाल अरुण भंडारे आणि प्रा. अशोक दास यांच्या हस्ते सर्वांना सहभाग प्रशस्तीपत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी कपिल पिसे यांनी आभार व्यक्त केले. येथील श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरची कार्यशाळा संपन्न झाली.