दि माळेगाव साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना जमीन क्षारपड मुक्तीसाठी मदत करणार
शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यात उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही
शिरोळ: सलीम माणगावे
दि .२५ :जमीन क्षारपड होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. श्री दत्त साखर कारखान्याने क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचा आदर्श घेऊन दि माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा करून ते क्षारपड मुक्तीचे काम करू इच्छितात, ही चांगली गोष्ट आहे. या शेतकऱ्यांनी संघटित होऊन, संस्था स्थापन करून, एकविचाराने काम केल्यास क्षारपड मुक्तीच्या कामास आम्ही सर्व ती मदत करू, अशी ग्वाही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पदाधिकारी आणि 200 शेतकऱ्यांनी केलेल्या अभ्यास दौऱ्याच्या समारोप प्रसंगी दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी क्षारपड जमिनीची भेडसावणारी समस्या आणि त्यावर श्री दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलेले यशस्वी ‘श्री दत्त पॅटर्नचे’ प्रयोग प्रोजेक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देवून त्यांचे समाधान केले.
तत्पूर्वी सर्वांनी शिरोळ तालुक्यामधील शिरोळ, घालवाड, शेडशाळ व कवठेगुलंद येथे राबविण्यात आलेल्या क्षारपडमुक्तीच्या कामाची पाहणी करून विस्तृत माहिती घेतली. शिरोळ, घालवाड, शेडशाळ व कवठेगुलंद येथील शेतकऱ्यांनी त्यांना जमीन क्षारपड मुक्त होण्यापूर्वीची आपली अडचण, समस्या सांगून क्षारपडमुक्तीच्या प्रयोगानंतर झालेले बदल आणि त्यांच्या जीवनात आलेली आर्थिक सुबत्ता या संदर्भात माहिती दिली.
माळेगाव कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी दत्तच्या क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुक करून शेतकऱ्यांना हा प्रकल्प पाहून वेगळी दिशा मिळाली आहे. क्षारपड मुक्तीच्या कामाला आपण लवकरच सुरू करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रा. ज्ञानेश्वर बुरुंगळे यांनी मानले.यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक इंद्रजीत पाटील, बाळासाहेब पाटील हलसवडे, माती परीक्षण अधिकारी ए. एस. पाटील, डिस्टिलरीचे अधिकारी संजय यादव, कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मरजे, माळेगाव कारखान्याचे संचालक तानाजीराव कोकरे, सुरेशराव खलाटे, तानाजीराव पोंदकुले, बन्सीलाल आटोळे, निशिकांत निकम, बाळासाहेब वाबळे, भीमदेव आटोळे तसेच डिस्टिलरी मॅनेजर नंदकुमार जगदाळे, सिव्हिल इंजिनियर अजित देवकाते, ॲग्री ओव्हरसीयर ज्ञानेश तावरे यांच्यासह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.