वाचन संस्कृती गतिमान करा -माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे आवाहन
* कोल्हापूर ग्रंथोत्सवाचा कवी संमेलानाने समारोप
कोल्हापूर: हबीब शेखदर्जी
दि. ७ : सध्याच्या डिजीटल युगात वाचकांनी डिजिटल वाचन साहित्याबरोबरच अधिकाधिक पुस्तके खरेदी करुन मराठी वाचन संस्कृती अधिक गतिमान करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इचकरंजीत आयोजित करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय व कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने इचलकरंजी येथे६ व ७ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत समारोप कार्यक्रमात श्री. आवाडे बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, माहिती अधिकारी वृषाली पाटील, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. सुशांत मगदूम, ग्रंथालय संघ कार्यवाहक भीमराव पाटील, आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्षा सुषमा दातार, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ जिल्हा समन्वय समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथोत्सव कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान श्री आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री. आवाडे म्हणाले, लेखकांनी वाचकांची आवड ओळखून विविध विषयांवर आधारीत त्या त्या भाषेतील पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावा. सध्या डिजिटलायझेशनमुळं सर्व बाबी ऑनलाईन मिळत आहेत. अशा वेळी ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण आदी विषयांची जगभरातील लेखकांची पुस्तकं विविध भाषांमध्ये डिजिटल पद्धतीनं उपलब्ध होत आहेत. यामुळे पुस्तकांच्या प्रती खरेदी करुन वाचण्याबरोबरच ई बुक वाचकांची संख्या वाढत आहे. वाचन आणि वाचकांच्या चळवळीला प्रेरणा देण्याच्या उद्देशानेच इचलकरंजीत ग्रंथ महोत्सव घेण्यात आला असून या ग्रंथोत्सवामुळे इचलकरंजीतील वाचकांना एकाच छताखाली दर्जेदार ग्रंथ खरेदीची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
समारोप कार्यक्रमापूर्वी झालेल्या कवी संमेलनाला नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी ग्रंथोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. या दोन दिवसांत ग्रंथ दिंडी, मराठी भाषेचा अभिजात दर्जा या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. हिमांशू स्मार्त यांचे व्याख्यान तसेच कुटुंब रंगलय काव्यात हे एक पात्री काव्य नाट्यानुभव मुंबई येथील विसुभाऊ बापट यांनी सादर केले. “मला भावलेले पुस्तक” यावर निवडक विद्यार्थ्यांसह उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले. निवडक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील उत्कृष्ट वाचकांचा गौरव करण्यात आला. तसेच डिजिटल युगातील वाचनसंस्कृती व ग्रंथालयांची भूमिका या विषयावर ज्येष्ठ संपादक निखिल पंडितराव यांनी मार्गदर्शन केले.
स्वागत सुषमा दातार यांनी केले. सूत्रसंचालन यशवंत मोहिते यांनी केले तर आभार प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात पुस्तकांचे १६ स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल्स वर सुमारे २ लाख ९३ हजार ५०० रुपयांचच्या १ हजार१८७ग्रंथांची विक्री झाली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.