:७ डिसेंबर रोजी प्रा. केदार टाकळकर यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान

 

 

इचलकरंजी,:विजय धुत्रे 

दि . ०३ डिसेंबर २०२५ –
सुनिल पाटील मित्र परिवारातर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पूर्व तयारीविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून हे व्याख्यान ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे घेण्यात येणार आहे. पुणे येथील प्रसिद्ध टाकळकर क्लासेसचे प्रा. केदार टाकळकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सुनिल पाटील मित्र परिवार हा अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेला उपक्रमशील समूह आहे. शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून योग्य दिशा देण्याचे कार्य सतत केले जात आहे.

इयत्ता दहावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असल्याने ‘एसएससी तयारी – मार्काची भरारी’ या उपक्रमांतर्गत परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातील तयारी, अभ्यासाचे नियोजन, सरावाची पद्धत, आरोग्य सांभाळणे, घरातील अभ्यासपूरक वातावरण, वाचन-पाठांतराचे योग्य वेळापत्रक, लिखाणाचा सराव, अभ्यासातील बैठक व्यवस्था अशा विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रा. टाकळकर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच ‘उत्तरपत्रिका लिहिण्याचे कौशल्य’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरही ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतील. प्रश्नाचे उत्तर कसे मांडावे?, एका ओळीत किती शब्द लिहावेत?, प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवावेत?, महत्वाचे शब्द अधोरेखित करण्याचे फायदे, समास कसे आखावेत?, अनावश्यक वेळ कुठे वाया जाऊ नये?, कोणते पेन वापरावे? यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यामध्ये दिली जाणार आहेत.

ही माहिती देताना सुनिल पाटील मित्र परिवारातर्फे इयत्ता १० वी मधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी पत्रकार बैठकीत महावीर खराटे, संजय कुडाचे, राजू निंबाळकर, चंद्रकांत पाटील, अतुल बावणे, विश्वास माने, महेंद्र गी हे उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.