प्राधान्यक्रम निश्चित करून गॅस सिलिंडरचे वितरण करावे – जिल्हाधिकारी अशोक काकडे
घरगुती व व्यावसायिक गॅस वितरण आढावा बैठकीत निर्देश
सांगली: अय्यान पटेल
दि. २३: जिल्ह्यात प्रथमदर्शनी गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा दिसून येत नाही किंवा याबाबत स्थापन नियंत्रण कक्षाकडे कोणतीही तक्रार प्राप्त नाही. मात्र, उपलब्ध गॅसचे सुरळीत वितरण व्हावे, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी. प्राधान्यक्रम निश्चित करून गॅस सिलिंडरचे वितरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.घरगुती व व्यावसायिक गॅस वितरण आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचा बैठक कक्षात आयोजित या बैठकीस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, पोलीस निरीक्षक संजय मोरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, रुग्णालये आदि प्राधान्याच्या ठिकाणी गॅससिलिंडर वितरण सुरळीत राहील, यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक सेवा, उपहारगृहे आदि ठिकाणी गॅस सिलिंडर वितरण करण्यात यावे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत नसल्याबाबत नियमित तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, शहरी भागात २५ दिवसांनंतर तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनंतर गॅस सिंलिडरकरिता नोंदणी करता येत असल्याबद्दल माहिती घेण्यात आली. यावेळी ग्रामीण भागात ४५ दिवसांचा नोंदणी कालावधी कमी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांची शक्यता तपासावी, असे त्यांनी गॅस कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच, शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार विविध ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून पुरवठा कशा पद्धतीने करण्यात येत आहे, याबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोळंखे, आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल गॅस कंपनीचे विक्री अधिकारी यांच्यासह कामगार, अन्न व औषध विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, महानगरपालिका, नगरपालिका व अन्य अनुषंगिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.