कडवई:
संगमेश्वर तालुका मुस्लिम संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दिनांक 12 मे 2025 रोजी कडवई येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील विविध गावांमधून संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. मुजीब खान यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. सभेस अध्यक्षपदी जमातुलमुस्लिमीन कडवईचे अध्यक्ष श्री. सिकंदर जुवळे यांची निवड करण्यात आली. ही शिफारस संघटनेचे सचिव श्री. अकबर दसुरकर यांनी केली, ज्याला श्री. इलियास मापारी यांनी अनुमोदन दिले.
यानंतर कुरआन पठणाने सभेची सुरुवात झाली. त्यानंतर काश्मीरमधील पहलगाम येथे देशसेवेत शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी अत्यंत सन्मानपूर्वक आणि देशभक्तीने ओतप्रोत भावनांमध्ये ही श्रद्धांजली अर्पण केली.
सभेचा मुख्य हेतू संघटनेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेणे, भावी सामाजिक उपक्रमांची आखणी करणे आणि मुस्लिम समाजासमोरील समस्यांवर चर्चा करत ठोस उपाययोजना निश्चित करणे हा होता.
या प्रसंगी श्री. सिकंदर जुवळे, श्री. नवीद भोंबल, श्री. मुजीब खान, श्री. मजीद नेवरेकर, श्री. अकबर दसुरकर, श्री. रऊफ खान, श्री. राहील जुवळे, आणि श्री. इलियास मापारी यांनी आपले विचार सविस्तरपणे मांडले. त्यांच्या भाषणांतून सामाजिक एकता, शैक्षणिक प्रगती, युवकांचे सक्षमीकरण, आणि संघटनेच्या संघटित कार्यपद्धतीवर भर देण्यात आला.
सभेनंतर उपस्थित सदस्यांनी आपली मते मांडून संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने संमत केले. उपस्थितांनी संघटनेच्या बळकटीकरणासाठी सक्रिय सहभाग देण्याचे वचन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी सभेचे अध्यक्ष श्री. सिकंदर जुवळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि सभा समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा केली.
या बैठकीत पुढील सभा १२ जून 2025 रोजी सकाळी १० वाजता माघारी मोहल्ला, संगमेश्वर येथे घेण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.