दागिन्यांच्या आमिषाने वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून गळा दाबून खून; संगमेश्वर पोलिसांच्या कसोशीनंतर गुन्ह्याचा छडा

कडवई, ता. संगमेश्वर, मुजीब खान 
दागिन्यांच्या आमिषाने संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून तिचा गळा दाबून निर्घृण खून केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस तपासात हा खून तिच्याच नातेवाईकांनी केल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपींनी मृतदेह जंगलातील दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे.

घटनेचा तपशील:
दि. ०९ मे २०२५ रोजी मुनीरा बशीर जुवळे (रा. कडवई, उभीवाडी, ता. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन त्यांची चुलत सासू बानु फकीर मोहंमद जुवळे (वय ७० वर्षे) दि. ०२ मे पासून बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. याप्रकरणी नापत्ता रजिस्टर नं. ०५/२०२५ प्रमाणे नोंद करण्यात आली होती.

वयोवृद्ध महिला बेपत्ता झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी तपास अधिक गतीने करण्याचे आदेश दिले.

तांत्रिक तपास व आरोपींची कबुली:
मोबाईल तपास, सीसीटीव्ही फूटेज व गोपनीय माहितीच्या आधारे हे उघड झाले की, हाजीरा मुसा माखजनकर, रिजवान महामुद जुवळे (दोघे रा. कडवई) व हुमायु शकील काझी (रा. फणसवणे) या तिघांनी संगनमताने बानु जुवळे यांचे टाटा नॅनो (एम.एच. ०५ ए.एक्स ९०९८) मधून अपहरण केले.

रिजवान जुवळे याला सीवूड्स, मुंबई येथून अटक करून सखोल चौकशी केल्यानंतर त्याने खूनाची कबुली दिली. त्याने व हुमायु काझीने बानु जुवळे यांचा गळा दाबून खून करून तिचे सोन्याचे दागिने (३० ग्रॅम ४५० मिलीग्रॅम) काढून घेतले व मृतदेह कुंभारखाणी बुद्रुक रोडजवळील जंगलातील दरीत फेकून दिला. सदर दागिने विकले असल्याची माहितीही तपासात समोर आली असून, सोनाऱ्याकडून ते जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी:
या गुन्ह्याचा यशस्वी तपास व आरोपींना अटक करण्याचे श्रेय खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांना जाते:

  • प्रमोद वाघ (सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्था. गु. अ. शा., रत्नागिरी)
  • शंकर नागरगोजे (पोलीस उपनिरीक्षक, प्रभारी, संगमेश्वर)
  • चंद्रकांत कांबळे, प्रशांत शिंदे (पो.उ.नि., संगमेश्वर)
  • सचिन कामेरकर, विनय मनवल, विश्वास बरगाले, सोमनाथ आव्हाड, बाबुराव खोंदल (पोहेकॉ / पोकॉ, संगमेश्वर)
  • दिपराज पाटील, विवेक रसाळ (पोहेकॉ, स्था. गु. अ. शा., रत्नागिरी)

सदर घटना ही समाजात मोठी खळबळ निर्माण करणारी असून, आपल्या स्वार्थासाठी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याचा संगमेश्वर पोलीसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावून आरोपींना अटक केली, ही कौतुकास्पद बाब आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.