कडवईत महिलेला निर्घृण मारहाण करून ठार मारले; ग्रामस्थांचा संताप, २०० महिलांच्या सह्यांसह पोलीस कारवाईची मागणी

कडवई (ता. संगमेश्वर,| दि. २६ मे २०२५ –

कडवई गावात अलीकडेच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळले आहे. बानू फकीर मोहम्मद जुवळे या महिलेचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला. या अमानवी घटनेने संपूर्ण गाव भयभीत झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

या घटनेप्रकरणी गावातीलच तिघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१. रिझवान महामूद नुवके
२. हुमायू शकील काझी
३. हाजीरा माखजनकर

या आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांना कोणत्याही प्रकारे जामीन मंजूर करू नये, अशी जोरदार मागणी गावातील महिलांनी व ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी ग्रामपंचायतीकडे औपचारिक निवेदन देण्यात आले असून, त्या माध्यमातून संगमेश्वर पोलीस ठाण्याला अधिकृत पत्र पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या निवेदनावर कडवई गावातील सुमारे २०० महिलांनी स्वाक्षरी करून या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. गावातील महिला आणि नागरिकांनी ग्रामपंचायतीकडून ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, संपूर्ण प्रकरणात त्वरित न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

गावातील शांतता व सुरक्षिततेसाठी हे अत्यंत आवश्यक असून, पोलीस प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घ्यावी, अशी ग्रामस्थांची एकमुखी भूमिका आहे.