आरेवरे समुद्रकिनारी भीषण दुर्घटना : ठाणे मुंब्रा येथील 4 पर्यटकांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी, : नियाज खान

दि.20 जुलै :रत्नागिरी तालुक्यातील आरेवरे समुद्र किनारी शनिवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. फिरण्यासाठी गेलेल्या ठाणे-मुंब्रा येथील चार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे मुंब्र्याहून उज्मा शामशुद्दीन शेख (वय 18) व उमेरा शामशुद्दीन शेख (वय 29) या रत्नागिरीतील आपल्या नातेवाइकांकडे आलेल्या होत्या. शनिवारी सायंकाळी त्या दोघी, जैनब जुनैद काझी (वय 26) आणि जुनैद बशीर काझी (वय 30, दोघेही रा. ओसवाल नगर, रत्नागिरी) यांच्यासह आरेवरे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते.

त्यावेळी समुद्र खवळलेला होता आणि दुपारीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. मात्र पाण्यात खेळण्याचा मोह टाळता न आल्याने चौघेही समुद्रात उतरले. अचानक उसळलेल्या प्रचंड लाटांनी त्यांना गाठले आणि त्या चौघांना समुद्राच्या खोल पाण्यात ओढून नेले. काही वेळ जीव वाचवण्यासाठी त्यांनी धडपड केली, एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही.

घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या काही लोकांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक मारली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. परंतु समुद्राच्या प्रचंड लाटा आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. सायंकाळी सुमारे 7 वाजता चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि स्थानिक बचाव पथकाने तात्काळ कार्यवाही केली.

या दुर्घटनेमुळे आरेवरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.