संजय गांधी निराधार व श्रावणबाळचे थकीत अनुदान लाभार्थ्यांना मिळावे

सुरेश हाळवणकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

इचलकरंजीअन्वर मुल्ला 

दि. २९ जुलै:   इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती राज्य वेतन योजनांच्या लाभार्थ्यांचे ऑक्टोबर २०२४ पासून अनुदान थकलेले आहे. शासनाने या लाभार्थ्यासाठी MAHADBT पोर्टल सुरु केले आहे. या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान थकलेले आहे त्यामुळे थकीत अनुदान लाभार्थ्याना त्वरित मिळावे यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

          इचलकरंजी शहरामध्ये निराधार, विधवा, परितक्त्या महिला व अपंगांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना व जेष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ सेवा निवृत्ती राज्य वेतन योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. ऑक्टोबर 2024 पासून शहरातील सुमारे ५००० संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनाच्या लाभार्थ्यांचे अनुदान थकलेले आहे. महाराष्ट्र शासनाने या लाभार्थ्यासाठी MAHADBT पोर्टल सुरु केले आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही व आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान थकलेले आहे. ज्यावेळी त्यांचे आधार कार्ड अपडेट होईल व आधार कार्ड  बँक खात्याशी लिंक होईल त्याच महिन्यापासून अनुदान लाभार्थ्याना मिळणार आहे. मागील अनुदान मिळणार नाही असे संजय गांधी निराधार योजना कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

          शहरामध्ये निराधार वृद्ध महिला व पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. घरात मुले बघत नसल्यामुळे या पेन्शनच्या येण्याऱ्या अनुदानाच्या आधारावर अनेकांचे जीवन अवलंबून आहे. जेष्ठ नागरिक असल्यामुळे अनेक आजारी लाभार्थ्यांचे अनुदान आल्यावरच ते औषध आणतात त्यामुळे या जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. अनुदान न आल्यामुळे अनेक निराधार या कार्यालयातून अक्षरशः रडत बाहेर पडत आहेत. याबाबत भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष दिपक पाटील, भाजपा जेष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष दिपक कडोलकर यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती सांगितली यावर हाळवणकर यांनी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून मागील फरक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

#suresh halwankar#ichalkaranji#