रत्नागिरी | ०२ ऑगस्ट २०२५:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रत्नागिरी एम.आय.डी.सी. परिसरात छापा टाकून “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी” (अंबरग्रीस) बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आणलेल्या इसमाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ₹२ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०:४५ वाजता, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आणि एम.आय.डी.सी., रत्नागिरी येथे सापळा रचण्यात आला व एजाज अहमद युसूफ मिरकर, वय ४१ वर्षे रा. घर नं. ३७४६, पिंगी मोहल्ला, मिरकरवाडा, ता. व जि. रत्नागिरी, सध्या रा. कदमवाडी, कोकणनगर, रत्नागिरी यास अटक करण्यात आले.
सदर आरोपीकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना, विक्रीच्या उद्देशाने अंबरग्रीस (Ambergris) साठवून ठेवलेले आढळून आले. त्याच्याजवळून २.५ किलो अंबरग्रीस अंदाजे किंमत ₹२,५०,००,०००/- , मोटारसायकल – अंदाजे किंमत ₹५०,०००/- असा एकूण मुद्देमाल: ₹२,५०,५०,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १५२/२०२५ अन्वये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१, ५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक – श्री. नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पो. हे. का. विजय आंबेकर, पो. हे. का. दिपराज पाटील , पो. हे. का. विवेक रसाळ, पो. हे. का. गणेश सावंत, चालक पो. का. अतुल कांबळे यांनी केली.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.