कडवई :
अंत्रवली गावातील ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शबाना लियाकत नेवरेकर यांची सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली.
दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवारी सरपंच सारंगी सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या सभेत मा. बाबू मानकरी यांनी शबाना नेवरेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सदर प्रस्तावाला माजी सरपंच सुरेश माईन आणि मंगेश सुर्वे (चकोली बाबू) यांनी अनुमोदन दिले. परिणामी शबाना नेवरेकर यांची सलग तिसऱ्यांदा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड निश्चित झाली.
निवडीनंतर सरपंच सारंगी सुर्वे यांनी शबाना नेवरेकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच ग्रामसभेत उपस्थित श्रीकांत जाधव, पिंट्या सुर्वे आणि शर्वरी यांनी ठोस पाठिंबा दर्शविला.
शबाना नेवरेकर यांनी यापूर्वी स्थानिक वाद व तंटे निपटारा करताना दाखविलेली पारदर्शकता, निर्णयातील सचोटी आणि मनमिळावू स्वभाव या गुणांमुळे त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा या पदावर विश्वासाने निवडण्यात आले.
शबाना लियाकत नेवरेकर यांच्या सलग तिसऱ्या निवडीमुळे अंत्रवली ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.