शहापूर पोलिसांची मोठी कारवाई – घरफोडीतील ४.५१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे जेरबंद

इचलकरंजी : अन्वर मुल्ला 
दि .१० : शहापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व विनानंबरची बुलेट मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्ह्याची हकीगत
दि. ७ सप्टेंबर २०२५   रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.१५ या वेळेत हातकणंगले तालुक्यातील कोरोची (अष्टविनायक नगर, विवेकानंदनगर) येथे फिर्यादी भारती सजन ढाले यांच्या घराचे कुलूप उचकटून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य वस्तू चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३०९/२०२५ भा.दं.वि. कलम ३०५[८], ३३१[३] नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.

मुद्देमाल
आरोपींकडून सुमारे २.८६ लाख रुपये किंमतीचे दागिने, चांदीचे ग्रासलेट, मोबाईल हँडसेट तसेच विनानंबरची काळ्या रंगाची बुलेट मोटारसायकल असा एकूण ४.५१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कारवाई व आरोपी
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून तुळजाभवानी मंदिर परिसरात संशयित इसम व महिला फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिली.
आरोपी –
१. कु. दिया सचिन गायकवाड (वय २०, रा. इंदिरानगर, कोरोची)
२. सिद्धांत श्रीकांत सगरे (वय २४, रा. धुळेश्वरनगर, कबनूर).

कारवाईत सहभागी अधिकारी
मा. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस नाईक अरीफ वडगावे करीत आहेत.