पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनारी कायमस्वरूपी उपाययोजना — जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी ; दीपक तुळसणकर 

दि. १८ : गणपतीपुळे समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वात उच्च प्राधान्याने सुरक्षा व्यवस्था उभाराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. प्रशिक्षित बचाव पथक, गृहरक्षक दल, पोलीस, धोका दर्शक झेंडे, ‘नो-स्विमिंग’ झोन, तसेच ब्रेथ ॲनालायझरद्वारे मद्यपींवर दंडात्मक कारवाई यासारख्या उपाययोजना कठोरपणे राबविण्याचे आदेश त्यांनी दिले.

          या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके, ग्रामसेवक प्रविण चौधरी, सरपंच कल्पना पकये, गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष निलेश कोलटकर, पंच श्रीराम केळकर, खजिनदार अमित मेहंदळे, मोरया वॉटरस्पोर्ट्स अध्यक्ष उदय पाटील, ग्रामसदस्य राज देवरुखकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले की, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तांत्रिक एजन्सीकडून अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तातडीने समुद्रकिनारी एलईडी स्क्रीन बसवून पर्यटकांसाठी आवश्यक सूचना दाखवाव्यात. तसेच वॉच टॉवरची संख्या वाढवून प्रशिक्षित लाईफगार्डची नियुक्ती करण्यावर त्यांनी भर दिला.लाऊडस्पीकरद्वारे सातत्याने चेतावणी संदेश देणे, गृहरक्षक दल व पोलीस यांच्या मदतीने मद्यपींवर ब्रेथ ॲनालायझरद्वारे कठोर कारवाई करणे, यावरही त्यांनी विशेष लक्ष द्यावे असे सांगितले.

       “अपघात रोखणे आणि मृत्यूचे प्रमाण शून्य करणे हे सर्व यंत्रणांचे सामूहिक उत्तरदायित्व आहे. प्रत्येकाने सक्रिय योगदान द्यावे,” असे आवाहनही श्री. जिंदल यांनी केले.