मुंबई : प्रतिनिधी
दि. १८ : प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराची जाणीव ठेवत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यातील पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा नवा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांना आधुनिक एआय साधनांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील पत्रकार कक्षात ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान चार दिवसीय एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. समारोप कार्यक्रमास कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे तसेच प्रशिक्षक व पत्रकार उपस्थित होते.
चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात एआयचा पत्रकारितेसाठी वापर, वृत्त पडताळणी, माहिती मिळविण्याची गती, डिजिटल कामातील अचूकता, फोटो-आधारित बातमी लेखन, व्हिडिओ लेखन, न्यूज रिपोर्टिंग, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक-डिजिटल माध्यमांसाठी लेखन, तसेच ‘चॅट पीडीएफ’ सारख्या टूल्सचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. पत्रकारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “पत्रकारांवर बातमीचा वेग आणि अचूकता टिकवण्याची दुहेरी जबाबदारी आहे. अशावेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नसून कामाला नवी धार देणारे सामर्थ्यवान साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम होणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे पुढे मांडले जातील.”
राज्यातील हे पहिलेच असे उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या चार महिन्यांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाची सूचना आली असून त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनीही पत्रकारांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल, असे नमूद केले. कार्यशाळेनंतर सहभागी पत्रकारांना मानपत्र प्रदान करण्यात आले. पत्रकार दीपक कैतके, संजय जोग, क्लारा लुईस यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्व प्रतिपादित केले.कार्यक्रमाचे आभार मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी मानले, तर सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्रसंचालन आणि खंडूराज गायकवाड यांनी समन्वयाची जबाबदारी निभावली.