कोल्हापूर: रेणू पोवार
दि.८:हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील रुही भंडारी (इयत्ता ६ वी) व सृजनी हलदार (इयत्ता १० वी) या दोन विद्यार्थिनींची ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ासाठी निवड झाली असून त्यांनी हिंदी विषयात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले.
हिंदी विकास संस्थान, दिल्ली यांच्या मार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी सन्मान समारंभ–२०२५ अंतर्गत ३० जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथील तीन मूर्ती भवन, प्रधानमंत्री संग्रहालय येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात डॉ. पूरन चंद टंडन (निदेशक, भारतीय अनुवाद परिषद, नवी दिल्ली) व डॉ. पीयूष कुमार शर्मा (अध्यक्ष, हिंदी विकास संस्थान, दिल्ली) यांच्या हस्ते रुही व सृजनी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी हिंदी विषय शिक्षिका ज्योती मस्के यांना शिक्षक प्रशस्तीपत्र, तर प्राचार्य अस्कर अली यांना प्रधानाचार्य गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, प्राचार्य अस्कर अली, शिक्षक व पालकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.“हिंदी भाषेच्या अध्ययनात सातत्यपूर्ण परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले असून या सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून इतरांनाही प्रेरणा मिळेल,” असे मत संचालिका सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केले.