बस प्रवासादरम्यान तरुणीचा पाठलाग; पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी ताब्यात

रत्नागिरी: सचिन पाटोळे

दि. १४: बारावी बोर्डची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा बसमध्ये पाठलाग करून तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना रत्नागिरी बस स्थानक परिसरात घडली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.१० वाजता संबंधित तरुणी बसने प्रवास करत असताना सिव्हिल हॉस्पिटल बस स्टॉपवरून एक इसम बसमध्ये चढला. त्याने तिचा पाठलाग करत शेजारी बसून तिच्या नकळत मोबाईलद्वारे छायाचित्रे काढल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी तरुणीची भेट घेतली व संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस यांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले.


सदर प्रकरणी संबंधित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८(१) व ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.